कथालेखन
पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा :
आंतरशालेय स्पर्धा - धावण्याच्या स्पर्धेत शाळेचा सहभाग - अथर्व शाळेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू - स्पर्धेचा दिवस - उत्तम सरावानंतर स्पर्धेत चुरस – प्रतिस्पर्धी तनयही उत्कृष्ट खेळाडू – चुरस खरी अथर्व व तनयमध्ये – प्रत्यक्ष स्पर्धा सुरू – अचानक तनयचा पाय मुरगळणे - अथर्वचे स्पर्धा सोडून तनयच्या मदतीला धावणे - अथर्व स्पर्धा हरूनही जिंकल्याचे समाधान – कौतुक.
कथालेखन
हरूनही तो जिंकला किंवा नाते माणुसकीचे
राजापूर गावातील अभिनव विदयालयमध्ये शिकणारा अथर्व नावाचा एक विद्यार्थी अभ्यासाबरोबर खेळातही उत्तम होता. उत्कृष्ट धावपटू म्हणून त्याची ख्याती होती. शिवाय तो स्वभावाने देखील एक गुणी, सुसंस्कारी मुलगा म्हणून सर्वपरिचित होता. त्याच्या शाळेला त्याच्याबद्दल विशेष अभिमान होता. धावण्याच्या शर्यतीत शालेयव आंतरशालेय स्तरावर अनेक वेळा त्याने शाळेला पारितोषिके मिळवून दिली. त्याचे प्रशिक्षक त्याच्याकडून नेहमी धावण्याचा सराव करुन घेत असत.
एकदा अशीच एक आंतरशालेय स्पर्धा आयोजित केली गेली होती, ज्यामध्ये अथर्वच्या शाळेने भाग घेतला होता. अथर्वचा प्रतिस्पर्धी म्हणून दुसऱ्या शाळेतील तनय नावाचा खेळाडू त्याच्याबरोबर धावण्याच्या शर्यतीत उतरला होता. दोघेही चांगले धावपटू होते. दोघांचाही आपापल्या शाळेत सराव सुरू होता.
अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. दोघेही एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून पळण्यास सज्ज झाले. स्पर्धा सुरू झाली. दोन्ही शाळांतील विदयार्थी आणि शिक्षक अथर्व व तनयला टाळ्या वाजवून प्रोत्साहित करीत होते. दोघांमध्ये चांगलीच चुरस लागली होती... आणि धावता धावता अचानक तनयचा पाय मुरगळला. तो तेथेच मटकन खाली बसला. बघणाऱ्यांच्या चेहऱ्यांवर आश्चर्य आणि भीती अशा संमिश्र भावना दिसूलागल्या. आता काय होणार असे प्रश्नचिन्ह सर्वांच्या चेहऱ्यावर होते. अथर्वला काय झाले आहे, हे कळेचना. धावताना तनय मागे राहिल्याचे आणि तो पडल्याचे कळताच अथर्वन स्पर्धा सोडली आणि धावतच तो तनयकडे गेला. त्याने तनयला आपल्या खांदयांचा आधार देत उठवले आणि हळूहळू धावपट्टीच्या बाहेर आणले, तितक्यात तनयचे प्रशिक्षक प्रथमोपचार पेटी घेऊन आले आणि त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरु झाले.
पुढे अथर्वच्या बाबतीत मात्र वेगळेच घडले होते. स्पर्धा जिंकण्यापेक्षा अडचणीत सापडणाऱ्याला मदतीचा हातदेणे महत्त्वाचे ही शिकवण तो विसरला नव्हता, हरण्याजिंकण्याच्या पलीकडे एक माणुसकीचे नाते तो जपत होता. त्यामुळे धावण्याची स्पर्धा हरूनही जगण्याच्या स्पर्धेत मात्र तो जिंकला होता.
दोन्ही शाळांतील शिक्षक, विदयार्थी व मान्यवरांकडून अथर्वच तोंडभरून कौतुक झाले. उत्तम मूल्यांची रुजवण विद्यार्थिदशेत खऱ्या अनि रुजवली जात होती याची प्रचिती सर्वांना 'याचि देही याचि डोळा येत होती.